ट्रंप : एक वादळी जीवनपट - पुस्तक रिव्ह्यू

लेखक - चांगदेव काळे
Saturday, 2 November 2019

लेखक : डॉ. अनंत पां. लाभसेटवार

स्वतःला सिद्ध करणारा माणूस

स्वतःची क्षमता ओळखून तिला न्याय देणारी माणसे तशी बोटावर मोजण्याइतकीच असू शकतात. ती प्रत्येक संधीचे सोने करण्यात यशस्वी झालेली असतात. आलेल्या संकटांना आव्हान समजतात. अपयशातही आपला डोलारा कोसळणार नाही याची काळजी घेतात. अशीच माणसे त्या त्या काळाच्या इतिहासावर स्वतःची नाममुद्रा कायमची कोरण्यात यशस्वी होतात. अशी जी थोडी माणसे आजच्या पटलावर आपल्यासमोर दिसत आहेत, त्यापैकी एक नाव आहे डोनाल्ड ट्रंप. सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष.

डोनाल्ड ट्रंप यांची दिनांक 21 जानेवारी 2017 रोजी अमेरिकेचे  45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांच्या या निवडीबाबत अनेक वादविवाद झडले. प्रसारमाध्यमांनी करता येईल तितकी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकही आघाडीवर होते. वैयक्तिक चारित्र्यापासून ते व्यवसायिकतेपर्यंतचा तळ ढवळून काढला गेला. त्यावरून बहुतेकांची खात्री झाली होती, ट्रंप हिलरी क्लिंटनला टक्कर देऊ शकणार नाही. परंतु विरोधकांचे मनसुुबे उधळले गेले. हे असे कसे घडले, हा भाबडा प्रश्‍न मग अनेकांना अस्वस्थ करीत राहिला.  पुढेही राहील कदाचित. परंतु त्यांची काही उत्तरे ही ‘ट्रंप’ यांच्या या चरित्रात दिलेली आहेत. राजकारणात एकाचवेळी सर्वांना सोबत घेण्याचे भान असले तरी तसे होत नाही. एखाद्याची बदनामी सगळ्यांना बदनामीच वाटते असेही नाही.  नेमके ज्याला हे कळते तो राजकारणात बाजी जिंकतो, हे ट्रंपच्या निवडीने सिद्ध केले आहे. त्याबाबतचे तपशील वाचताना राजकारणातले डावेउजवे आणि मतदारांची मानसिकता, हे मुद्दे एका वेगळ्या पातळीवरून तपासण्याची संधी हे पुस्तक देते.

डोनाल्ड ट्रंप यांचे वैयक्तिक आयुष्य कसे आहे, हा काही कुतूहलाचा विषय असू शकत नाही. उडदामाजी काही काळेगोरे असणार हे आपण गृहित धरलेले असते. ट्रंप त्यातले एक असे म्हणून आपण त्यांना सोडून देऊ शकत नाही. काही दोष आपल्या नजरेतून असू शकतात, तसे दोष ट्रंपच्या अंगी आहेत. ते शौकीन आहेत. सौंदर्याचे पूजक आहेत. परंतु याची  दुसरी बाजूही आहे. ती आहे रसिकतेची. त्यांची रसिकता, उच्च अभिरुची, सौंदर्यदृष्टी ही केवळ स्त्रीदेहाच्या पूजनाशी जोडता येत नाही, त्यांच्या कलात्मकपद्धतीने केलेल्या बांधकामाच्या साक्षीने सिद्ध झालेली आहे. त्यांच्या जगण्याच्या कल्पनेतून झालेली आहे. तरीही त्यांच्या सर्व दोषांसह लेखकाने या पुस्तकात दिलेली आहे, कुठलीही भीड न ठेवता. यात कुठेही ट्रंपचे समर्थन करण्याचा अट्टाहास नाही. मुळातच उच्चभ्रू घरात जन्माला आलेला,  एका मोठ्या कुटुंबाचा संस्कार लाभलेला, तरीही स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी स्वतः मेहनत केली आहे. ज्याची सुरुवात पेपर घरोघरी टाकण्यापासून करतो. आयुष्याचा पाया भक्कम करण्यासाठी या मेहनतीचा नक्कीच वाटा मोठा आहे.

डोनाल्ड यांचे वडील, फ्रेड यांचा स्वतःचा बांधकाम व्यवसाय होता. डोनाल्ड त्यात सहभागी झाले.  वडील ठेकेदारांना ठोकून ठोकून त्यांच्याकडून कमीतकमी किंमतीला माल व सेवा घेई. मजुरांकडून पदवून काम घेई. वडिलांचे हे कौशल्य डोनाल्डनी आत्मसात केले आणि आयुष्यभर ते स्मरणात ठेवले. वसुली अधिकार्‍यांसोबत फिरून वसुलीशास्त्र आत्मसात केले.  जोडीला युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनियाच्या व्हार्टन बिझिनेस स्कूलमध्ये पदवी घेतली. ही पायाभरणी त्यांचे आयुष्य भक्कमपणे उभे करण्यास कायमच उपयुक्त सिद्ध झाली. त्यांनी बांधलेल्या इमारतींची यादी पाहण्यासारखी आहे. ट्रंप टॉवर, ट्रंप प्लाझा, ट्रंप ताजमहाल, ट्रंप कॅसल हॉटेल व कॅसिनो, ट्रंप इंटरनॅशनल हॉटेल अँड टॉवर.  त्यांनी नुसत्या इमारती बांधलेल्या नाहीत. त्यांची जागा किती आणि कशी मोक्याची आहे, त्याचा विचार केला. त्या जागा कशा ताब्यात येतील यासाठी आवश्यक असणारे व्यावसायिक कौशल्य त्यांच्याकडे आहे. इतरांवर आलेले संकट ही आपली संधी आहे, हे ओळखून त्यांनी त्या प्रत्येक संधीचे सोने केले.  बांधलेल्या  इमारती हे नजरेत भरावेत असे टॉवर आहेत. त्यांच्यात काव्य निर्माण होईल याची काळजी घेतलेली आहे. त्यावेळी त्या टॉवरवर स्वतःच्या नावाची नाममुद्रा स्थापित करण्यात कुठेही कसूर ठेवलेली नाही.  ट्रंप आणि त्यांचे बांधकाम याचा प्रचंड दबदबा अमेरिकेत आहे, जो डोळे दीपवणारा आहे. त्यांनी निर्माण केलेली हॉटेल्स ही प्रंचड महागडी असूनही ग्राहकांना तेथे जाण्यात भूषण वाटते, त्याचे कारण तिथे असलेले वैभव आणि मिळणारी उच्च दर्जाची सेवा. अर्थात हे सारे सहजासहजी घडलेले नाही. त्यासाठी त्यांनी वापरलेल्या युक्त्या, चातुर्य आणि दूरदृष्टिकोन हे गुण कारणीभूत आहेत.

ट्रंप यांनी बांधकाम व्यवसाय केला, तारांकित इंटरनॅशनल हॉटेल्स काढली. इतकेच नव्हेतर जुगार आणि कॅसिनो सारख्या व्यवसायापासून स्वतःला दूर ठेवू शकलेले नाहीत. परंतु या सगळ्यात कुठेही अवैधता नाही. सगळेकाही रीतसर परवानग्या मिळवून. या परवानग्या मिळण्यातली कारणे, इतर सहव्यावसायिक त्याच्याशी व्यवहार करण्यास खूश असण्याची कारणे, इतर अनेक सकारात्मक गोष्टींची आवर्जून नोंद लेखकाने घेतलेली आहे. या सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःला दारूपासून दूर आहेत.  ट्रंप ही व्यक्ती हात लावील तिथे पैसा काढील, अशी किमयागार व्यक्ती. पैसा कमवणे हे त्यांचे उद्दिष्ट.  त्या उद्दिष्टात ते कुठेही कमी पडलेले नाहीत.  त्यामुळे  व्यवसायात मिळालेले यश नक्कीच दृष्ट लागावी असे आहे. परंतु सागराला नेहमीच भरतीचे दिवस नसतात.   वैभवालाही तोच नियम लागू होत असावा. एकवेळ अशीही आली की, ट्रंपच्या डोक्यावर असलेल्या कर्जाची रक्कम किती आहे, आणि त्याला कर्ज देणार्‍या बँकाची संख्या किती आहे, याचा त्यांनाही अंदाज नव्हता. तब्बल तीन पाँईट दोन  अब्ज डॉलर इतकी कर्जाची रक्कम निघाली. आणि कर्ज देणार्‍या बँकांची संख्या होती बहात्तर! त्यांची सगळी संपत्ती विकूनही हे कर्ज फिटणारे नव्हते.   त्यावेळी ते हबकून जाणे स्वाभाविक होते. परंतु डगमगले नाहीत. ना कुठल्या व्यवसानाच्या आहारी गेले. त्यांनी  त्यांचे अब्जाधीश असण्याचे सोंग कायम ठेवले. ही गोष्ट आहे जून 1990 च्या दरम्यानची. दुसरी एक बाजू मांडलेली आहे, ती आहे कोर्टकचेरीची. इतक्या केसेस त्यांच्या नावावर आहेत की, जणू त्यांची त्यांना सवयच झालेली आहे. हा तपशील देताना लेखकाने चरित्रनायकाची कुठलीही बाजू लपवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट प्रत्येक व्यवहारासाठी किती रकमा मोजाव्या लागल्या. कुठे किती नफा झाला, कुठे किती तोटा झाला, याचे सगळे तपशील दिलेले आहेत. ते देत असताना अमेरिकेतील अर्थव्यवस्था, तेथील व्यवहारांची रीत, कुठल्या जागांना किंमत आहे, यात कोणकोण बडे व्यावसायिक आहेत, बांधकाम मजुरांची मुजोरी, मजुरांचे संघ, संप आणि  अडवण्याचे धोरण, शासकीय यंत्रणा, असा मोठा तपशील समोर ठेवलेला आहे.  चरित्रात्मक लेखन करताना केवळ चरित्रनायकाचे वर्णन नको असते, त्याच्या भोवतीचे वातावरण, व्यवहार, इतर अनुषंगिक गोष्टींचा तपशील सोबत असावा लागतो. लेखकाने ते भान कटाक्षाने जपलेले आहे.

ट्रंपच्या ऐश्‍वर्यात उणीव नावाची गोष्टच नाही. ऐश्‍वर्य म्हणून जे जे असेल ते ते त्यांच्याकडे आहे.  अमेरिकेच्या 242 वर्षांच्या इतिहासात स्वतःचे विमान असलेला पहिला अध्यक्ष, असे त्यांचे वर्णन केले जाते. त्याच्यासाठी त्यांनी शंभर दशलक्ष डॉलर मोजलेले आहेत.  अंतर्गत सजावट ही राजमहालाला मान खाली घालायला लावील इतकी उच्च दर्जाची आणि तितकीच कलात्मक करून घेतली.  वायुसेवा कंपनी घेतली. पस्तीस दशलक्ष मोजून स्वतःसाठी मोठी बोट घेतली.  सौंदर्याचा उपासक असल्याने आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धांच्या आयोजनात सहभागी झाले नसते तरच नवल होते. त्यांनी त्यातही आपले नशीब अजमावले.  फुटबॉलची टीम विकत घेण्याचा खेळाडूपणा दाखवला. त्यांना स्वतःला खेळाची आवड आहे हे त्याच्या गोल्फपे्रमावरूनही लक्षात येते. वेळ मिळेल तेव्हा ते गोल्फ खेळायला जातात, मात्र ते स्वतःच्या मालकीच्या गोल्फकोर्सवर. असे त्यांचे सोळा कोर्स वेगवेगळ्या देशात आहेत.

ट्रंप यांनी आणखी दोन गोष्टी केल्या, ज्यांचे नाव ऐकले तर कुणाचाही सहजासहजी विश्‍वास बसणार नाही. परंतु लेखकाने ट्रंपची सगळीच बाजू समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, यात याही नवलाच्या गोष्टी आहेत. यातली एक आहे, टीव्ही शो. ‘अप्रेंटिस’ नावाचा शो. सादरकर्ता आणि निर्माता यजमान अशा दुहेरी भूमिकेत. इतका काळ केवळ बांधकाम व्यावसायिक म्हणून परिचित असलेले हे व्यक्तिमत्त्व एक अभिनेता म्हणून देशभर परिचित झाले. हा शो तब्बल चौदा वर्षे चालला. यातून त्यांना  दोनशे बेचाळीस दशलक्ष डॉलर मिळाले. ही रक्कम त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्यावेळी अर्जात नोंद केलेली आहे.  अर्थाजनाशिवाय  प्रचंड प्रसिद्धी मिळाली व नाममुद्रा बळकट झाली, अशा दुहेरी फायदा.  दुसरी नवलाची गोष्ट आहे ती लेखक होण्याची. डोनाल्ड ट्रंप स्वतः लेखक असून त्यांचे पहिले पुस्तक आहे ‘द आर्ट ऑफ द डील’.  ज्याच्या खपाचा आकडा आहे दहा लाखापेक्षा अधिक प्रती. दुसरं पुस्तक आहे ‘द आर्ट ऑफ द कमबॅक’. तेही यशस्वी झाले. आणि एकापाठोपाठ अशी वीस पुस्तके ट्रंपच्या नावावर जमा झाली.  त्यासाठी त्यांना मिळालेल्या मानधनाची रक्कम तीस ते चाळीस दशलक्ष डॉलर्स असावी, असा लेखकाचा अंदाज आहे.

ट्रंपने कर्जफेड करून पुन्हा आपले वैभव उभे केले. अध्यक्षीय निवडणूक जिंकली. अध्यक्ष म्हणून मिळणार्‍या वेतनातला एक डॉलर घेऊन बाकीचे दान केले जाते. पक्षीय बळ आणि संसदेची कार्यपद्धती यामुळे हवे तसे निर्णय घेणे अवघड ठरते. परंतु त्यांच्या काळात जे निर्णय घेतले जात आहेत, ते अमेरिकेचे हित समोर ठेवून. त्यासाठी टीका होत असली तरी लेखकाच्या मते तेथील रोजगार वाढला आहे. तेथील उत्पन्नात वाढ झाली आहे. व्हिसा प्रकरण हे त्याचाच एक भाग आहे. 

लेखकाने हे चरित्र लिहिताना अनेक संदर्भ शोधले आहेत. नीट असा अभ्यास करून त्याची आखणी केली आहे. ते स्वतःच प्रस्तावनेत नमूद करतात की, कुठलेही लेखन करण्यापूर्वी मी त्याचा नीट अभ्यास करतो.  त्याचा अनुभव हे लेखन देते. ट्रंप हे व्यक्मित्त्व बहुआयामी आहे. त्यांची उंची आणि प्रतिष्ठा उच्च दर्जाची आहे. तिला अनेक पैलू आहेत. असे चरित्र लिहिताना केवळ प्रतिभा असून उपयोगी नाही, कौशल्य, तारतम्य आणि अनेक व्यवधानांचे भान राखणे आवश्यक ठरते. ती सर्व काळजी लेखकाने कटाक्षाने घेतलेली दिसून येते. प्रत्येक व्यवहाराचा चोखपणा तपासून पाहिलेला आहे. कौटुंबिक माहिती देताना त्यातला संस्कार पुसला जाणार याची ट्रंप यांनी जितकी काळजी घेतली तितकीच लेखकाने घेतलेली आहे. लेखक स्वतः अमेरिकास्थित आहे. ट्रंप त्यांच्यासाठी दूरचे नाहीत. तरीही एका अध्यक्षांचे चरित्र लिहिताना त्यांचा भक्त आहे, ही भूमिका कुठे समोर आलेली नाही. ती प्रस्तावनेतही स्पष्ट केलेली आहे. यात अनेक अमेरिकन तपशील आहेत, ज्यांचा परिचय आपल्याला असण्याचे कारण नाही. तो परिचय सोप्या पद्धतीने करून दिलेला आहे. मांडणी प्रकरणनिहाय केल्याने त्यात आलेला सुटसुटीतपणाही महत्त्वाचा ठरतो.     शीर्षकात नमूद केल्याप्रमाणे ट्रंप यांचे चरित्र खरोखर वादळी आहे. ते स्वतः वादळी आहेत आणि त्यांच्याभोवती सतत उटणारी इतर वादळे, या दोन्ही अर्थानी.  त्यामुळे वाचकांच्या मनात अनेक शंकाकुशंकांची वादळे उठतात ही दुसरी बाजू. तसे असलेतरी लेखकाने हे चरित्र समोर ठेवून उत्तरे दिलेली नाहीत, तर वाचकांच्या मनात ट्रंपसाठी एक कप्पा निर्माण केला आहे, असे निश्‍चितपणे म्हणता येईल. सतीश भावसार यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ सजविलेले आहे.

चांगदेव काळे, 9869207403 
302, इंदू हौसिंग सोसायटी, 
जरीमरी मंदिराजवळ, 
पाखाडी-खारीगाव, 
कळवा, ठाणे (प) 400605

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News