जिलेबीचा तुकडा
एक होती जिलेबी...
अगदी लाडाची...
आई बाबांची नवसाची...
जिलेबीच्या जन्मानंतर घरी रोजचेच दिवस जणू सन भासू लागले होते. दिवस दिवसेंदिवस चोरपावलांनी पुढे सरकत होते. आता जिलेबी वाढू लागली. सवंगड्यासोबत बागडू लागली, 'हे हवं-ते हवं' म्हणून आई बाबांजवळ हट्ट धरू लागली.
या जिलेबीला मात्र जिलेबी खायला खूssssप आवडायची बर! समोर 'जिलेबी' दिसली की पुरे, बाईसाहेबांनी फडशा पाडलाच म्हणून समजा. मग काय? या जिलेबीसाठी घरी खाऊच्या डब्यात आई जिलेबी मात्र कायम शिल्लक ठेवायची. शाळेतून घरी आल्यावर 'जिलेबी' मिळाली नाही की ही जिलेबी आख्ख घर डोक्यावर घ्यायची. सण समारंभ असो किंवा घरी गोडाच जेवण. त्यात या जिलेबीला 'जिलेबी' मात्र हवीच असायची.
आई बाबा जिलेबीला खूप जपायची, पण वाढत्या वयासोबत जिलेबीचं जिलेबीप्रेम पण वाढत चाललं होतं. कोण्या एका शेजारच्या बाळाच्या बारशाला ही जिलेबी आईसोबत गेली अन् 'जिलेबी' समोर पाहताच जिलेबीसाठी अगदी वेडीपिशी झाली. सगळ्यांचा डोळा चूकवून जिलेबीचं अख्ख ताट घेऊन कोपरा गाठला अन् फडशा पाडून तिथेच झोपी गेली. इकडे आईने चांगली अर्धा तास शोधाशोध केल्यावर जिलेबी सापडली खरी, पण 'जिलेबी'सारखीच वेटोळी होऊन झोपी गेलेली. तेही जिलेबीचं ताट हातात घेऊन मग मात्र घरभर हशा पिकला.
जिलेबीच्या जिलेबी प्रेमाचे खूप सारे प्रसंग घडले. असेच एकदा बाबांसोबत पाहुण्यांच्या घरी दुःखाच्या कार्यासाठी गेलेल्या जिलेबीला तिथं जिलेबी पाहून मोह काही आवरेना. शेवटी डोकं लढवून 'पिशवीला मुंग्या लागल्या आहेत,, थांबा झाडून आणते बाहेरून' म्हणत पिशवीसकट बाहेर पळ काढला. सगळ्यांचा डोळा चुकवून हवी तेवढी जिलेबी गट्ठम केली अन् मग ही जिलेबी घरात आली जिलेबीची पिशवी घेऊन.
तशी ही जिलेबी शाळेत फार हुशार होती बरंsss. आई-बाबांना भारी कौतुक वाटायचं तीचं. या जिलेबीच्या जन्मावेळी 'पेढाच हवा' म्हणून खट्टू झालेली आजी. आज त्याच आजीचा जीव की प्राण होती ही जिलेबी. जिलेबी सारख्याच मधाळ स्वभावामुळे.
जिलेबीच लग्नाचं वय झालं. एका सुस्वभावी मुलाशी लग्न ठरलं. अन् दणक्यात विवाह सोहळा पार पडला. लग्नात पंगतीला 'जिलेबी'चा मान होताच बरंsss! आता संसाराला सुरुवात झाली' आनंद 'नोकरीनिमित्त परगावी असे. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपले. शाळा-कॉलेजमध्ये बागडनारी जिलेबी आता संसाराची जबाबदारी सांभाळू लागली. अचानक अकाली प्रौढत्व आल्यासारखं वागू लागली. अन् काही दिवसातच या जिलेबीच्या पोटी आणखी एक जिलेबी वाढू लागली. संसाराची जबाबदारी सांभाळताना या जिलेबीला बऱ्याचदा 'जिलेबी'ची आठवण होई, पण गोड काही खाऊ नका मॅडम.
हार्मोन्स इंबॅलन्स होतील. अन् ते त्रासदायक ठरु शकेल. हा डॉक्टरी सल्ला! "शेवटी परिस्थिती मनाला मुरड घालायला शिकवतेच की..." कधी झालाच मोह अनावर की मग ही जिलेबी आपली 'जिलेबी' खाण्याची इच्छा आनंदला सांगे अन् आनंद कामाच्या व्यापात या जिलेबीचा जिलेबी हट्ट पुरवने अगदी 'न चुकता' विसरून जाई. अन् मग जिलेबीचे 'जिलेबीप्रेम' मात्र मनातच राही.
रोजच्या कामाच्या व्यापाच्या दगदगीने जिलेबी अशक्त बनली होती. आज मात्र मागच्या चार दिवसांपासून असलेला थंडी-ताप चांगलाच वाढला होता. जवळपास मागच्या आठ दिवसांपासून जिलेबीने नीटस् जेवण घेतलं नव्हतं. अंग तापाने भाजून निघत होतं. अगदी काही क्षण उठून बसायलाही अंगात त्राण उरला नव्हता; पण आज जवळपास महिनाभरानंतर आनंद गावाहून घरी परतनार होता, तो आनंदही होताच. त्यात भर म्हणजे आई-बाबासुद्धा येणार होते. जिलेबीला पाहायला-भेटायला. इतक्यात कोणाची तरी चाहूल लागली, ठरल्याप्रमाणे आई-बाबा आले होते. त्यांना पाहताच जिलेबी मनोमन आनंदली; पण लक्ष मात्र आईच्या हातातल्या पिशवीकडे होतं.
शेवटी आई बाबांची लाडकी जिलेबीच ती. अन् मोठ्या माणसांमध्ये ही खोडकर हट्टी असं छोटं मुल दडलेल असतंच की. आईने स्वतःच्या हाताने बनवलेला खूप सारा खाऊ पिशवीतुन काढून ठेवला, पण जिलेबीची नजर अजूनही त्या पिशवीवरच खिळली होती. काय शोधत होती ती?
इतक्यात आनंदही आला. तीला पाहून अक्षरशः किंचाळलाच. 'काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची? काळजी घेत जा. कित्तीदा सांगायाचं तुला? शब्द जिलेबीच्या कानात शिरतच नव्हते. तीच चित्त मात्र आनंदच्या बॅगेकडे लागलं होतं. गच्च भरलेली बॅग पाहून जरा हायस वाटलं. खूप गप्पा झाल्यानंतर तासाभराने बोलत बोलत आनंदने प्रवासातुन घरी धुण्यासाठी आणलेले कपडे बॅगेतुन बाहेर काढले आणि आता मात्र जिलेबीच्या संय्यमाचा अंत झाला. काहीही न बोलता फक्त दोन्ही डोळे पाझरु लागले.
आई बाबांच्या काळजाचा हा तुकडा मात्र जिलेबीच्या तुकड्यासाठी कुढत राहिला, मनोमनी. हीच तर अवस्था असते, घरा-घरातील जिलेबीची. स्वतःच्या इच्छा आकांक्षाची होळी करून कसलं समाधान पदरी पडत बरं? 'अहो' त्यागातही सुख असतंच की, पण खरच असतं?