या १४ कलाकारांचा रंगमंच रंगणार संसदेत...

संतोष भिंगार्डे
Saturday, 1 June 2019

चौदा कलाकार संसदेत जाणार आहेत आणि त्यातील काही कलाकारांनी पहिल्यांदाच दिल्लीचे तख्त पाहिलेले आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या कलाकारांची संख्या जास्त आहे.

जनमानसात कलाकारांची असलेली लोकप्रियता कॅश करण्याचा प्रयत्न विविध पक्ष नेहमीच करीत असतात. त्याकरिता आपापल्या पक्षाकडून कलाकारांना उमेदवारी देतात. मग तो कलाकार त्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवितो. कुणी जिंकतो; तर कुणी हरतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विविध ठिकाणी सेलिब्रेटी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत होते. दोन-चार कलाकार सोडले, तर या वेळच्या लोकसभा निवडणुकीत चौदा कलाकारांनी विविध मतदारसंघात मतदारांना जिंकून संसदेत प्रवेश मिळवला आहे.

त्यामध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या कलाकारांची संख्या जास्त आहे. आता हे चौदा कलाकार संसदेत जाणार आहेत आणि त्यातील काही कलाकारांनी पहिल्यांदाच दिल्लीचे तख्त पाहिलेले आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. खरे तर आतापर्यंत रमेश देव (शिवसेना), मच्छिंद्र कांबळी (काँग्रेस), महेश मांजरेकर (मनसे), नंदू माधव (आप), दीपाली सय्यद (आप) या मराठी कलाकारांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतु यातील कुणालाही दिल्ली गाठता आली नाही. पण डॉ. अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली आणि ते खासदार झाले.

 
डॉ. अमोल कोल्हे यांच्याशिवाय दुसऱ्या महाराष्ट्रातील दुसऱ्या कलाकार आहेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार अमरावतीच्या नवनीत कौर राणा. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा विजयी झाल्या आहेत. खरे तर सन २०१४ मध्येही त्यांनी निवडणूक लढविली होती; परंतु तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्याचा वचपा त्यांनी आता काढला आहे. नवनीत कौर राणाने तेलुगू चित्रपट अधिक केलेले आहेत. मल्याळम्‌ आणि पंजाबी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. आता एक सेलिब्रेटी महिला खासदार म्हणून त्यांची कसोटी लागणार आहे.

 
हेमामालिनी, सनी देवोल, मनोज तिवारी, किरण खेर, बाबुल सुप्रियो, स्मृती इराणी, रवीकिशन, डॉ. अमोल कोल्हे, नवनीत कौर राणा, हंसराज हंस, नुसरत जहाँ, मिमी चक्रवर्ती, देव (दीपक अधिकारी) व सुमलता असे हे चौदा कलाकार लोकसभा निवडणूक जिंकलेले आहेत. 

स्मृती इराणी यांची वाटचाल सगळ्यांना ठाऊक आहे. छोट्या पडद्यावरची ‘क्‍योंकी सांस भी कभी बहू थी’ ही त्यांची गाजलेली मालिका. यामधील तुलसीची व्यक्तिरेखा साकारून त्या घरोघरी पोहोचल्या. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. २००३ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २००४ मध्ये दिल्लीतील चांदनी चौकातून लोकसभा निवडणूक लढविली होती आणि कपिल सिब्बल यांच्याविरोधात जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये अमेठीतून निवडणूक लढविली होती आणि त्या वेळच्या पराजयाचा वचपा त्यांनी आता २०१९ मध्ये काढला आणि पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थानही पटकावले आहे.

 

हेमामालिनी यांनी भाजपतर्फे दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत त्या मथुरेतून उभ्या होत्या. त्या तीन लाख मतांनी जिंकून आल्या. 

अभिनेता सनी देओल यांनी एप्रिल महिन्यात भाजपत प्रवेश केला. लगेच पंजाबमधील गुरुदासपूरमधून त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आणि ते विजयही झाले. पक्षप्रवेश, निवडणूक आणि संसदेत जाण्याचा प्रवास उणापुरा महिन्या-दीड महिन्याचा आहे!

 
भोजपुरी गायक आणि अभिनेता मनोज तिवारी यांनी २००९ मध्ये राजकारणात पहिल्यांदा पाऊल टाकले. २०१४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्या वेळी ते लोकसभेत निवडून आले होते. २०१४ प्रमाणेच आताही ते बहुमतांनी विजयी झाले.

 
तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे मिमी चक्रवर्ती यांनी पश्‍चिम बंगालमधील जाधवपूर येथून निवडणूक लढवली. त्या मूळच्या जलपायगुडीच्या. बालपण आणि प्राथमिक शिक्षण अरुणाचल प्रदेशमध्ये झाले. ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता. बंगालमधील त्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढविली आणि जिंकून आल्या.

कोलकाता येथील बशीरहाट येथून ममता बॅनर्जींनी नुसरत जहाँ यांना तिकीट दिले. आपल्या छोट्याशा चित्रपट करिअरमध्ये त्यांनी कितीतरी टॉपच्या स्टार्सबरोबर काम केले आहे. २०११ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. किरण खेर अभिनेता अनुपम खेर यांची पत्नी. त्यांनीदेखील अनेक चित्रपटांत काम केले. २००९ मध्ये भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि २०१४ मधील लोकसभेची निवडणूक चंदीगडमधून लढवून विजयी ठरल्या. २०१९ मध्ये पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. 

कन्नड अभिनेत्री सुमलता यांनी अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटकातील मांड्या मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि त्या विजयी ठरल्या. सुमलता यांनी कन्नड, मल्याळम्‌, तेलुगू व हिंदी या भाषांतील चित्रपटात काम केले आहे. कन्नड अभिनेते आणि काँग्रेसचे दिवंगत नेते एम. एच. अंबरिश यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. कारण जागावाटपात हा मतदारसंघ जनता दल (सेक्‍युलर) कडे गेला. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतला. भाजपने त्यांना पाठिंबा दिला आणि त्या निवडून आल्या.  

 
भोजपुरी सुपरस्टार रवीकिशन यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढविली आणि तीन लाखांहून अधिक मताधिक्‍याने ते विजयी ठरले.  पंजाबी सुफी गायक हंसराज हंस यांनी उत्तर पश्‍चिम दिल्लीतून भाजपतर्फे लोकसभा निवडणूक लढविली होती आणि ते विजयी ठरले. भाजपने उदित राज यांना तिकीट न देता हंसराज हंस यांना उमेदवारी दिली.  

अभिनेते दीपक अधिकारी हे पश्‍चिम बंगालमधील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. पश्‍चिम बंगालमधील घाटल मतदारसंघातून दीपक ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षातून उभे होते.

भारतीय चित्रपटसृष्टीसमोर अनेक प्रश्‍न आहेत. प्रश्‍न लावून धरणे आणि ते सत्तापक्षाच्या कलावंतांनी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, असा सम्यक समन्वय साधला जाईल. फक्त प्रश्‍नच नाही; तर वेगवेगळ्या कला-क्षेत्रातील आवाज खासदार कलावंत संसदेपर्यंत पोहोचवतील, अशी अपेक्षा करूया!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News